आपण आपल्या जीवनाचा आनंद घेत आहात का?
जीवनाचा आनंद

आपण आपल्या जीवनाचा आनंद घेत आहात का?

आपण आपल्या जीवनाचा आनंद घेत आहात का?

प्रश्न हा आहे “आपण आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहोत का ?”

“वॉशिंग्टन डी.सी. मधील मेट्रो स्टेशनात एक माणूस एका कोपऱ्यात बसला आणि व्हायोलिन वाजवायला लागला; जानेवारीची थंडी होती. त्याने सुमारे ४५ मिनिटे बाखचे सहा संगीताचे तुकडे वाजवले. त्या वेळी, गर्दीची वेळ असल्याने, जवळ जवळ ११०० लोक स्टेशनात आले गेले, त्यापैकी बहुतेक जण कामावर जात होते.

तीन मिनिटे गेली आणि पहिल्यांदा एका मध्यमवयीन माणसाच्या लक्षात तो संगीत वादक आला. त्याने आपला वेग कमी केला, आणि काही सेकंद थांबत, आणि मनगटावरील घड्याळात पहात तो तिथून चालता झाला.

एक मिनिटानंतर, व्हायोलिन वादकाला त्याची पहिली डॉलरची टिप मिळाली: एका महिलेने न थांबता पैसे त्या वादकाकडे फेकले आणि घाईत निघून गेली.

काही मिनिटांनंतर, एक जण त्या वादकाचे संगीत ऐकण्यासाठी थोडा थबकला, मग त्या माणसाने त्याच्या घड्याळाकडे पाहिले आणि पुन्हा चालू लागला. त्याला कामासाठी उशीर होत होता.

ज्याने सर्वात जास्त लक्ष दिले तो एक 3 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या आईने त्याला ताबडतोब हिसका दिला आणि त्याला फरफटत ओढत घेऊन गेली. पण त्या मुलाने व्हायोलिन वादकाकडे पहायचे थांबवले नाही. तो शेवटपर्यंत मागे वळून वळून पहात होता.

इतर अनेक मुलंही या मुलाप्रमाणेच त्या वादकाकडे आकर्षित झाली. पण त्यांच्या पालकांनीही त्यांना ओढत नेले.45 मिनिटेच वादकाने वादन केले. केवळ ६ लोक थांबले. तेही अगदी थोडा वेळ. फक्त २० जणांनी त्याला पैसे दिले. तो आपल्याच धुंदीत वाजवत होता. तेवढ्या वेळात त्याने फक्त 32 डॉलर जमा केले.

त्याने त्याचे व्हायोलिन वादन संपविले. सर्वत्र शांतता झाली. कोणीही त्याचे कौतुक केले नाही. त्याच्या व्हायोलिन वादनाला दाद दिली नाही. .तो व्हायोलिन वादक दुसरा तिसरा कोणी नसून जोशुआ बेल होता, जो जगातील सर्वात प्रतिभावान संगीतकारांपैकी एक ओळखला जातो. त्याने आत्ताच आपल्या साडे तीन दशलक्ष डॉलर्सच्या व्हायोलिनवर एक नुकताच रचलेला संगीताचा सुंदर तुकडा वाजविला होता.

सबवेमध्ये वादनाच्या दोन दिवसा पूर्वीच जोशुआ बेलने बोस्टनमधील एका थिएटरमध्ये हाऊस फुल शो केला होता. त्या शोच्या तिकीटाची सरासरी किंमत होती १०० डॉलर्स. (संदर्भ. (http://awesomevideomakers.com/joshua-bell-subway-video/)

जोशुआ बेला वॉशिग्टन डी. सी. मेट्रो स्टेशन मध्ये व्हायोलिन वाजवत होता.

असाच प्रयोग लोकप्रिय गायक सोनू निगमनेही मुंबईत केला हता. त्याला फक्त एका तरुणाने वीस रुपये दिले. सोनू निगमने ते फ्रेम करून आपल्या घरी ठेवले आहेत. ती कमाई तो मौल्यवान मानतो.

वरील दोन प्रसंगांवरून आपण या निष्कर्षावर येऊन पोहोचतॊकी आपल्या आजूबाजूला असंख्य सुंदर गोष्टी घडत असतात. पण आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या आपल्या लक्षातही येत नाहीत. आपण खरोखर आपल्या जीवनात आनंद घेत आहोत का? म्हणजे, आपण मधुर भोजन, नेत्रदीपक सूर्यास्त, चांगली कलात्मक चित्रकला किंवा पहिला पाऊस पडल्यानंतरचा मातीचा सुगंध किंवा सुरेख लय आणि उत्कृष्ट सुरेल अशा कर्णमधुर आणि आनंददायक सुमधुर संगीत यांचे कौतुक करता?

बहुतेक लोक आपल्या रोजच्या जीवनात गुंतलेले असतात. आपल्या इंद्रिय / सेन्सर्स सुद्धा बोथट किंवा मंद झाले आहेत. पिकासोने म्हटल्याप्रमाणे “आम्ही जन्मजात कलाकार असतो.” पण आपण आपल्या नित्याच्या रोजच्या जीवनात, कामात व्यस्त असतो आणि आयुष्याचा आनंद घेण्याचे विसरून जातो. आयुष्य खूप लहान आहे. शेवटी, जेव्हा मी स्वतःला विचारेन , मी माझे आयुष्य जगलो काय, तर मग माझ्या चेहऱ्यावर हास्य असावे.

या ashokathoughts वेबसाइटचा माझा हेतू आपले ज्ञानेंद्रिय जास्त तीक्ष्ण, संवेदनशील बनविणे. डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ ही आपली पंचेंद्रिये आहेत .नकळतपणे आपण लावलेले फिल्टर काढून टाकण्यासाठी काही व्यायाम आपल्या पंचेंद्रियांना आणि आपल्या मेंदूला आवश्यक आहे. हे व्यायाम केवळ जीवनाच्या आनंदाच्या आस्वादासाठीच नाही तर व्यवसायात आणि आपल्या दैनंदिन कामकाजात आपली निर्णयक्षमता आणि सर्जनशीलता देखील वाढवतील. आपला उजवा मेंदू अधिक कार्य करेल.

मी सर्जनशीलता आणि कलेच्या आस्वादावर जवळजवळ 250+ पुस्तके अभ्यासली. कलाकार होण्यासाठी नव्हे तर हिरव्यागार आणि निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा ओळखण्यासाठी मी वयाच्या 48 व्या वर्षी वॉटर कलर पेंटिंग शिकलो. मी भारतीय शास्त्रीय बासरी वाजवतो.मी स्वार्थी आहे. या वेबसाइटद्वारे मी माझा स्वत:चा आनंद आणि सर्जनशीलतेचा शोध घेणार आहे.

डॉ अशोक गायकवाड.

या लेखावर आपले विचार मांडण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

GO TO THINKER’S PLATFORM.